लातूर जिल्हा

लातूर जिल्ह्यातून १८ तलवारी, घातक शस्त्रांसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलिस दल अलर्ट झाले असून जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सात वेळा कोम्बिंग ऑपरेशन करून १८ तलवारी, घातक शस्त्रही जप्त केली आहेत. यावेळी अवैध धंद्यावर कारवाई केली असून ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

लातूर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी ७ मेरोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि पोलिस दल सज्ज झाले आहे. १६ मार्च ते २७ एप्रिलअखेर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईसाठी विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. कोंिम्बग ऑपरेशन, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन, मोठ्या प्रमाणावर गावभेटी, गुन्हेगार आणि शांतता भंग करणा-याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मटका-जुगारप्रकरणी जिल्ह्यात ९३ गुन्हे दाखल केले आहेत. तब्बल १४ लाख १० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देशी-विदेशी दारू, चोरट्या मार्गाने होणारी हातभट्टीची वाहतूक, निर्मिती, विक्री करणा-याविरुद्ध एकूण ५२६ गुन्हे दाखल केले. २६ लाख ६८ हजार २८९ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. हातभट्टी दारूसह, हजारो लिटर रसायन नष्ट केले आहे.

सामाजिक शांतता धोक्यात आणणा-या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत, अट्टल गुन्हेगार, गुंडाविरोधात ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. गत दीड वर्षाच्या कालावधीत नऊ आरोपींविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या काळात चार जणांविरोधात ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे.

२३ ठिकाणी नाकाबंदी
जिल्ह्यात विविध २३ ठिकाणी, जिल्ह्यासह आंतरराज्य सीमेवर ९ चेक पोस्ट/नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनाची तपासणी केली जात आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत गुन्हा करण्याच्या तयारीतील दबा धरून बसलेल्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय, विविध आरोपींकडून १८ तलवारींसह घातक शस्त्र जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button